मोदींनी स्वातंत्र्य चळवळीचा अपमान केला - काँग्रेस
By Admin | Updated: August 18, 2016 17:20 IST2016-08-18T17:20:38+5:302016-08-18T17:20:38+5:30
ब्रिटीश राजवटीत काँग्रेसला जो त्रास सहन करावा लागला त्यापेक्षा भाजपने स्वातंत्र्यानंतर जास्त अडचणींचा सामना केला आहे.

मोदींनी स्वातंत्र्य चळवळीचा अपमान केला - काँग्रेस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - ब्रिटीश राजवटीत काँग्रेसला जो त्रास सहन करावा लागला त्यापेक्षा भाजपने स्वातंत्र्यानंतर जास्त अडचणींचा सामना केला आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी केले. मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने लगेच आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे.
कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा भाजपने सर्वाधिक बलिदान केले आहे. आतापर्यंतच्या प्रवासात भाजप एकमेव पक्ष आहे ज्याला सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागला. इतक्या विपरित परिस्थितीचा काँग्रेसनेही ब्रिटीश राजवटीत सामना केलेला नाही. मागच्या ५०-६० वर्षात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी अशा अडथळयांचा सामना केला आहे असे मोदी यांनी सांगितले.
मोदींनी अशी विधाने करुन स्वातंत्र्य चळवळीचा अपमान केला आहे. मोदींनी आपले विधान मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. देशासाठी ज्यांनी बलिदान केले. ज्यांना फाशी झाली, तुरुंगात गेले त्या सर्वांचा मोदींनी अपमान केला आहे असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले.