मोदींनी छोट्या मोदींच्या मदतीने दोन पक्ष्यांची शिकार केली - दिग्विजय सिंह
By Admin | Updated: June 17, 2015 12:48 IST2015-06-17T12:03:02+5:302015-06-17T12:48:57+5:30
मोठ्या मोदींनी लहान मोदींच्या मदतीने दोन पक्ष्यांची शिकार केली असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींनी छोट्या मोदींच्या मदतीने दोन पक्ष्यांची शिकार केली - दिग्विजय सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - ललित मोदीप्रकरणात सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांचे नाव आल्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी तिखट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोठ्या मोदींनी लहान मोदींच्या मदतीने दोन पक्ष्यांची शिकार केली असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आयपीएलचे माजी आयुक्त आणि भारतातून फरार झालेल्या ललित मोदींना मदत केल्याचे उघड झाल्यापासून काँग्रेसने मोदी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. बुधवारी दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.सुषमा स्वराज यांनी ललित मोदी व ब्रिटनचे खासदार केथ वाझ यांची भेट घेतली होती का यावर सुषमा स्वराज यांनी स्पष्टीकरण द्यावे, तसेच वसुंधरा राजे यांनीही मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. ललित मोदीं प्रकरण हे ललित मोदी यांनी स्वतःच रचले असून नरेंद्र मोदींचे मौन बरेच काही सांगून जाते असे ट्विट त्यांनी केले आहे. नरेंद्र मोदी व ललित मोदींनी मिळून दोन्ही पक्ष्यांची शिकार केली असे सूचक ट्विट करत सिंह यांनी या वादामागे मोदींचाच हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.