निकालाआधीच ‘मोदी सरकार’!

By Admin | Updated: May 13, 2014 08:13 IST2014-05-13T05:42:54+5:302014-05-13T08:13:13+5:30

वृत्तवाहिन्या त्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) आधारे नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात दिल्लीच्या सत्तेची माळ घालून मोकळ्या झाल्या आहेत.

'Modi Government' was already removed! | निकालाआधीच ‘मोदी सरकार’!

निकालाआधीच ‘मोदी सरकार’!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल अधिकृतपणे जाहीर होण्यास अद्याप चार दिवसांचा अवधी असला तरी देशातील बहुसंख्य वृत्तवाहिन्या त्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) आधारे नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात  दिल्लीच्या सत्तेची माळ घालून मोकळ्या झाल्या आहेत. निवडणुकीच्या नवव्या आणि अखेरच्या फेरीचे मतदान संपताच बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांनी ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर केले. केंद्रातील काँग्रेसप्रणीत संपुआ आघाडीची गेली १० वर्षांची सत्ता संपुष्टात येईल, यावर सर्वच वाहिन्यांचे एकमत दिसले. रालोआला किती जागा मिळू शकतात याबाबतीत मात्र त्यांनी वर्तविलेल्या अंदाजांमध्ये मोठी तफावत दिसून आली. सर्वसाधारणपणे या वाहिन्यांनी रालोआला २४९ ते २९०च्या दरम्यान जागा मिळून मोदी पंतप्रधान होतील, असा अंदाज वर्तविला. या वाहिन्यांच्या अंदाजानुसार काँग्रेसप्रणीत संपुआला १०१ ते १४८ जागा मिळतील, तर प्रादेशिक पक्ष, डावे पक्ष व इतरांच्या वाट्याला १४६ ते १५६ जागा जातील. ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष आमच्या अपेक्षेनुसारच आहेत व आम्हाला निश्चित बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला. काँग्रेसने मात्र हे अंदाज फेटाळून लावत केंद्रात रालोआच्या विरोधातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येऊन मोदी व त्यांच्या पाठीशी असलेल्या धार्मिक शक्तींना सत्तेपासून दूर ठेवतील, अशी खात्री व्यक्त केली. मुळात ‘एक्झिट पोल’ची विश्वासार्हताच शंकास्पद असल्याने काँग्रेसने यासंबंधीच्या कोणत्याही कार्यक्रमात पक्षाच्या कोणत्याही नेत्याने सहभागी होऊ नये, असा फतवा काढला. एक्झिट पोल पार पाडणार्‍यांनी दोन ते तीन टक्के अंदाज चुकण्याची कबुलीही देऊन टाकली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) - अधिक वृत्त/१०

Web Title: 'Modi Government' was already removed!