मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहतेय - केजरीवाल
By Admin | Updated: January 15, 2016 18:39 IST2016-01-15T18:06:39+5:302016-01-15T18:39:41+5:30
मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहतेय - केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीला निष्क्रिय करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे, पण तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळे पासून माझ्याविरोधात वेगवेगळे कट रचले जात आहेत, असे ते म्हणाले. दिल्लीत प्रदुषण कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑड-ईव्हन योजनेच्या समारोपाच्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी पारदर्शकता आणि खरेपणा ही माझी प्रमुख अस्त्रं असल्याचं त्यांनी सांगितले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अलिकडेच केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्या दिवसाला केजरीवाल यांनी काळा दिवस असे संबोधत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध मोदी यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे म्हणत टीका केली.
पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांकडून समजले की मनिष किंवा सतींदर यांच्यावर पुढील छापा पडणार आहे. त्यांच्याकडील अधिकाऱ्यांवर काहीतरी चूक करण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच तुम्ही काहिही करा मोदीजी आमच्यासोबत सत्य आणि देव आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला धोका पोचवू शकत नाही असे दुसऱ्या एका ट्विटद्वारे केजरीवालांनी म्हटले आहे.