मोदी सरकारला देशातून उखडून फेकू - लालूप्रसाद यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 18:32 IST2015-11-08T15:58:21+5:302015-11-08T18:32:50+5:30
दिल्लीत मोदी सरकारला एक दिवसही सत्तेत ठेवणे देशासाठी धोकादायक असून मोदी सरकारला उखडून फेकू असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारला देशातून उखडून फेकू - लालूप्रसाद यादव
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - बिहारमधील निवडणुकीप्रमाणेच देशातूनही नरेंद्र मोदी उखडून फेकू असा निर्धार व्यक्त करत दिल्लीत मोदी सरकारला एक दिवसही सत्तेत ठेवणे देशासाठी धोकादायक आहे अशी भीती लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचीच वर्णी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये जदयू - राजदप्रणित महाआघाडीला बहुमत मिळाले आहे. रविवारी मतमोजणीत महाआघाडीला सत्ता मिळाल्याचे स्पष्ट होताच लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी नितीशकुमार व अन्य नेतेही उपस्थित होते. बिहारमधील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचा आभारी आहो असे सांगत लालूंनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. राजदला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच असतील असे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. आम्ही दोघेही बिहारला विकासाच्या वाटेवर नेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.