मांझींना अधिक वेळ देण्यामागे मोदींचा हात!
By Admin | Updated: February 12, 2015 23:18 IST2015-02-12T23:18:42+5:302015-02-12T23:18:42+5:30
आमदारांचा घोडेबाजार करणे शक्य व्हावे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात

मांझींना अधिक वेळ देण्यामागे मोदींचा हात!
नवी दिल्ली/पाटणा : आमदारांचा घोडेबाजार करणे शक्य व्हावे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा स्पष्ट आरोप जदयूचे नेते नितीशकुमार यांनी केला आहे. दरम्यान जुन्या परंपरा, घटनात्मक तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारावरच आपण मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यास सांगितले आहे, असे बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
मांझी यांना तात्काळ बहुमत सिद्ध करा, असे न सांगता त्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावरही नितीशकुमार यांनी टीका केली. मांझींना लगेच बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. नितीशकुमार म्हणाले, ‘केंद्राने घोडेबाजार करण्याचा जो परवाना दिलेला आहे त्यावर अंमल करणे शक्य व्हावे यासाठी राजधानी दिल्लीत उच्चस्तरावरून लिहिण्यात आलेल्या पटकथेचे राज्यपाल पालन करीत आहेत.’ भाजप लोकशाहीचा गळा आवळत असल्याचा आरोप करून नितीशकुमार म्हणाले, भाजपचा पाठिंबा हवा असेल तर किमान ३५ आमदारांची जुळवाजुळव करा, असे भगव्या पक्षाने मांझी यांना सांगितलेले आहे. राज्यपालांनी आधी निर्णय घेण्यास विलंब लावला आणि नंतर मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी वेळ दिला. हे सर्व दिल्लीत लिहिण्यात आलेल्या पटकथेनुसारच केले जात असल्याचे आणि घोडेबाजाराच्या परवान्यावर अमल करण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे स्पष्ट होते. मांझी यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्याची सुरुवात झाली, असे नितीशकुमार म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)