सूट भेट स्वीकारुन मोदींनी तोडला नियम ?
By Admin | Updated: February 19, 2015 11:53 IST2015-02-19T11:45:05+5:302015-02-19T11:53:04+5:30
नरेंद्र मोदींनी महागडा सूट भेट म्हणून स्वीकारत गृहमंत्रालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
सूट भेट स्वीकारुन मोदींनी तोडला नियम ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाखमोलाच्या सूटावरुन सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे नाहीत. मोदींनी ऐवढा महागडा सूट भेट म्हणून स्वीकारत गृहमंत्रालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता यावर मोदी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान बंद गळ्याचा सूट घातला होता. अनिवासी भारतीय आणि हिरे व्यापारी रमेशकुमार विरानी यांनी मोदींना हा सूट भेट स्वरुपात दिल्याचे समोर आले आहे. मोदींसोबत आमच्या कुटुंबाचे चार दशकांपासून संबंध असून मोदी हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहे असे विरानी यांनी म्हटले होते.
गृहमंत्रालयातर्फे केंद्रीय व राज्यातील मंत्र्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. यानुसार केंद्र किंवा राज्यातील मंत्री नातेवाईक सोडून अन्य कोणाकडूनही महागड्या भेटवस्तू स्वीकारु शकत नाही. गृहमंत्रालयाने लागू केलेल्या आचारसंहितेमधील अनुच्छेद ४.२ नुसार कोणताही मंत्री जेव्हा परदेशात जातो किंवा विदेशी पाहूणे जेव्हा भारतात येतात, त्यावेळी तो मंत्री त्यांच्याकडून भेट स्वीकारु शकतात. या भेटवस्तूंचे दोन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामधील पहिला प्रकार म्हणजे प्रतिकात्मक भेटवस्तूचा असतो. यामध्ये सन्मान म्हणून दिलेली शाल, तलवार इत्यादींचा समावेश होतो. या भेटवस्तू मंत्री स्वतःकडे ठेवू शकतात. तर दुसरा प्रकार म्हणजे गैर प्रतिकात्मक भेटवस्तू असा असतो. या भेटवस्तूंचे मुल्य ५ हजारपेक्षा कमी असायला हवे. त्याचे मूल ५ हजारापेक्षा जास्त असल्यास ती भेटवस्तू सरकारच्या तोशखान्यात जमा करावी लागते. जर मंत्र्यांना ती भेटवस्तू स्वतःकडे ठेवायची असेल तर त्या भेटवस्तूचे मुल्य त्याला सरकारी तिजोरीत भरावे लागते.
गृहमंत्रालयाच्या या आचारसंहितेचे पालन केले जावे याची दक्षता घेण्याची जबाबदारी पंतप्रधानांकडेच असते. मात्र आता पंतप्रधानांनीच या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची चर्चा दिल्लीत दबक्या आवाजात सुरु आहे.