मोदींना बिहारी झटका
By Admin | Updated: November 9, 2015 03:41 IST2015-11-09T03:41:26+5:302015-11-09T03:41:26+5:30
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नरेंद्र मोदी-अमित शहा या करामती जोडीच्या जोरावर चौखूर उधळलेल्या भारतीय जनता पार्टीला बिहारच्या जनतेने रविवारी बिहारी झटका दाखवला.

मोदींना बिहारी झटका
पाटणा : लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नरेंद्र मोदी-अमित शहा या करामती जोडीच्या जोरावर चौखूर उधळलेल्या भारतीय जनता पार्टीला बिहारच्या जनतेने रविवारी बिहारी झटका दाखवला. मोदी व शहा यांनी स्वत: शंभरहून अधिक प्रचारसभा घेऊन, अत्यंत प्रतिष्ठेच्या बनविलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला. सांप्रदायिक शक्तींना बिहारमध्ये पाय रोवू द्यायचा नाही, या पक्क्या इराद्याने एकत्र आलेल्या नितीशकुमार, लालूप्रसाद व काँग्रेस यांच्या महाआघाडीने तीनचतुर्थांंश
असे घवघवीत बहुमत मिळवले.
सर्व २४३ मतदारसंघांचे निकाल हाती आले, त्यावरून महाआघाडीला १७८ व भाजपा आणि मित्रपक्षांना ५८ जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीतील लालूंच्या राष्ट्रीय जनता दलास ८० तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास ७१ जागा मिळाल्या, तरी आधी ठरल्याप्रमाणे नितीश हेच मुख्यमंत्री होतील, असे लालूंनी स्पष्ट केले. नितीश बिहारचे राज्य सांभाळतील व आपण स्वत: दिल्लीत राहून संपूर्ण देशातून भाजपाचा ‘सुकडा साफ’ करण्याच्या कामाला लागू, असेही लालू प्रसाद यांनी जाहीर केले.
वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलेल्या भाजपाने, बिहारची सत्ता काबीज करण्यास हरतऱ्हेचे हातखंडे वापरले. सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यापासून ते व्यक्तिगत चिखलफेक करण्यापर्यंत पातळी गाठत विखारी प्रचार केला. सव्वा लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे
आमिषही दाखविले, परंतु बिहारच्या जनतेने अशी काही चपराक दिली की, सत्ता तर दूरच, पण भाजपाला गेल्या निवडणुकीत होत्या तेवढ्या जागा कायम राखणेही जमले नाही. २०१० च्या निवडणुकीत ९१ जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या झोळीत ५३ जागाच पडल्या. मित्रपक्षांनी यात आणखी पाच जागांची भर टाकली, पण त्याने भाजपाची नाचक्की कमी झाली नाही. डाव्या पक्षांना मात्र खातेही खोलता आले नाही. मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या.
महाआघाडी
जदयू - ७१ जागांवर विजयी
राजद - ८० जागांवर विजयी
काँग्रेस - २७ जागांवर विजयी
एकूण - १७८ जागांवर विजयी
भाजपाप्रणित रालोआ
भाजपा - ५३ जागांवर विजयी
लोकजनशक्ती पार्टी - २ जागांवर विजयी
राष्ट्रील लोकसमाज पक्ष - २ जागांवर विजयी
हिंदूस्तान आवाम मोर्चा - १ जागांवर विजयी
एकूण - ५८ जागांवर विजयी
इतर ७ जागांवर विजयी झाले आहेत.
मोदी ज्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत, ती गाडी गेल्या १८ महिन्यांपासून सुरूच झालेली नाही. मोदीजी जरा एक्सलेटर दाबा, गाडी पुढे न्या, नाहीतर जनताच तुम्हाला गाडीतून खेचून बाहेर फेकून देईल. - राहुल गांधी
का झाला भाजपाचा पराभव?
महागाई, नेत्यांची बेछूट विधाने
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे
मित्रपक्षांची नाराजी, नेत्यांनी कार्यकर्त्यांना
दिलेली असहिष्णू वागणूक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी
आरक्षणाच्या विरोधात केलेले वक्तव्य
पंतप्रधान मोदींचा नितीशकुमारांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी फोन करून नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. निकाल काहीही लागला असला, तरी प्रचारात जाहीर केलेले पॅकेज बिहारला दिले जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.
हा बिहारच्या स्वाभिमानाचा विजय आहे. काट्याची टक्कर आहे, म्हणणाऱ्यांना जनतेने दाखवून दिले आहे. - नितीशकुमार
बिहार सरकारला आमच्या शुभेच्छा ! : ‘बिहारला विकासाच्या नव्या मार्गावर नेण्यासाठी नव्या सरकारला आमच्या हार्दिक शुभेच्छा. विजयाबद्दल मी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो. - अमित शहा