मोदी पर्वाला सुरुवात...
By Admin | Updated: May 26, 2014 19:42 IST2014-05-26T19:42:21+5:302014-05-26T19:42:21+5:30
संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि सुमारे ३००० आमंत्रितांच्या उपस्थितीत भारताच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

मोदी पर्वाला सुरुवात...
नवी दिल्ली, दि. २६ - संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि सुमारे ३००० आमंत्रितांच्या उपस्थितीत भारताच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सबका साथ, सबका विकास असा नारा देत भारताला विकासाचे, समृद्धतेचे स्वप्न दाखवलेल्या मोदींना जनतेने भरभरून मते दिली आणि गेल्या २५ वर्षात प्रथमच एकाच पक्षाला बहुमत प्राप्त झाले. अरुण जेटली, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे, स्मृती इराणी, व्यंकय्या नायडू, अनंत गीते आदी ४४ मंत्र्यांसह मोदींनी शपथ घेतली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह दक्षिण आशियाई देशांच्या प्रमुखांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात अत्यंत भव्य अशा सोहळ्यामध्ये शपथविधी पार पडला असून विदेशी पाहुण्यांसह पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून स्वताला मजदूर नंबर १ म्हणणारा पंतप्रधान कामाला लागला असून, उद्याच म्हणजे २७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मोदींची परस्परसंबंधांवर चर्चा होणार आहे.
नरेंद्र मोदी हे अत्यंत धडाकेबाज असून निर्णय घेण्यात व त्यांची अमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी सध्यातरी सुरुवात छोट्या मंत्रिमंडळापासून केली आहे. युपीएमध्ये सुमारे ७५ मंत्री होते, तर सध्याच्या मंत्रिमंडळात ४४ मंत्री आहेत. त्यामुळे सरकार कमी व प्रशासन जास्त अशी मोदींची भूमिका असल्याचे आणि प्रत्यक्ष कामगिरीला जास्त महत्त्व असल्याचा संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.