मोदीलाट ओसरली!
By Admin | Updated: August 26, 2014 04:35 IST2014-08-26T04:35:03+5:302014-08-26T04:35:03+5:30
केंद्रात सत्तेत आल्याला उणेपुरे ९० दिवस होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांच्या नेतृत्वातील भाजपाची ४ राज्यांतील १८ जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली आहे.

मोदीलाट ओसरली!
फराज अहमद, नवी दिल्ली
केंद्रात सत्तेत आल्याला उणेपुरे ९० दिवस होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांच्या नेतृत्वातील भाजपाची ४ राज्यांतील १८ जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली आहे. या निकालांनी धर्मनिरपेक्षतेवर श्रद्धा असलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. बिहार, पंजाब, कर्नाटक व मध्य प्रदेशात या पोटनिवडणुका झाल्या. लोकसभेतील यश हा मोदींचा विजय असल्याचे सांगणारे भाजपा नेते आता हा निकाल म्हणजे मोदींच्या कामावरील जनमत नव्हे, असे सांगू लागले आहेत.
बिहारमधील मतदारांनी नव्याने स्थापन झालेल्या लालू-नितीश आणि काँग्रेसच्या आघाडीवर विश्वास दाखवला. तेथील १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेसला मिळून सहा ठिकाणी विजय मिळाला. भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. राजदला तीन, जदयूला दोन व काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच १० जागांपैकी सहा भाजपाने, तीन राजदने आणि एक जागा जदयूने जिंकली होती.
पंजाबमध्ये दोन जागांपैकी एक जागा काँग्रेस व एक जागा अकाली दलाने जिंकली. पटियाला मतदारसंघात काँग्रेसच्या परणीत कौर व दुसऱ्या जागेवर शिरोमणी अकाली दलाचे जित मोहिंदरसिंग विजयी झाले.