आमदारपुत्राने दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

By Admin | Updated: March 22, 2015 00:01 IST2015-03-22T00:01:14+5:302015-03-22T00:01:14+5:30

आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावे, राजकारण गाजवावे अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते.

MLA's son interviewed to be a soldier | आमदारपुत्राने दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

आमदारपुत्राने दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

जयपूर : आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावे, राजकारण गाजवावे अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलाने शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्णातील निवाई विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार हिरालाल रैंगर यांचा मुलगा हंसराज केवळ इयत्ता आठवीपर्यंतच शिकू शकला. त्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. खुद्द आमदारांनी याबाबत बोलताना सांगितले की, मी स्वत: तीन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदकही पटकाविले आहे. परंतु दुर्दैवाने मुलगा मात्र शिक्षणात मागे पडला. मी समाजकल्याण विभागात उपसंचालक होतो. सरकारी नोकरी मिळाल्यानेच त्याचे भविष्य सुरक्षित राहील याची मला संपूर्ण कल्पना आहे. तो शिकू शकला नाही. त्यामुळे अशाचप्रकारच्या नोकरीची त्याची क्षमता राहिली आहे. अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी पदांच्या भर्तीसाठी जाहिरात निघाली होती. मुलाने अर्ज केला आणि त्याला शुक्रवारी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. कुठल्याही व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे आणि मुलगा कमी शिकला असल्याने तो अशाचप्रकारची नोकरी करू शकतो, असे हिरालाल रैंगर यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: MLA's son interviewed to be a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.