उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणारी एक महिला टेलीकॉलर गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले, पण ना तिचा मृतदेह सापडला, ना ती जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. गायब झालेल्या तरुणीचे नाव साक्षी वर्मा आहे. ती 'यूपी ११२' या हेल्पलाईन नंबरवर टेलीकॉलर म्हणून काम करत होती. ती २९ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडली आणि दोन तासांतच बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्यासोबत असलेल्या सचिन नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?साक्षीची आई संगीता यांनी ३० ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. यात त्यांनी जौनपूरच्या सचिन उर्फ कृष्णा जायसवाल याच्यावर मुलीला सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास केला असता, २९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० पर्यंत साक्षी आणि सचिन दोघेही १०९० चौकाजवळ एकत्र होते, असे दिसून आले. त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले आणि ते सीसीटीव्ही फुटेजमधूनही गायब झाले. सचिन त्यानंतर रिवर फ्रंटवर एकटाच फिरताना दिसला. एका आईस्क्रीमवाल्याने सांगितले की, दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता आणि त्यानंतर कोणीतरी नदीत उडी मारल्याचा संशय त्याला आहे.
सचिनने काय सांगितले?साक्षी बेपत्ता झाल्यावर सचिनने आपली स्कूटी चारबाग येथे सोडून दिली आणि तो भोपाळला पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ५ सप्टेंबर रोजी त्याला भोपाळमधून अटक केली. त्याच्याकडून साक्षीचा फोनही जप्त करण्यात आला. सचिनने पोलिसांना सांगितले की, भांडणानंतर त्याने साक्षीचा फोन हिसकावून घेतला आणि तिला तिथेच सोडून तो निघून गेला. त्यानंतर ती कुठे गेली, याची त्याला काहीही कल्पना नाही. सचिनची आणि साक्षीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. तिथूनच त्यांच्यात प्रेम फुलायला सुरुवात झाली होती.
गोमती नदीत २५ किलोमीटरपर्यंत शोधमोहीम!या घटनेनंतर पोलिसांनी एसडीआरएफच्या टीमसह गोमती नदीत २५ किलोमीटरपर्यंत शोधमोहीम राबवली. दोन दिवस ही मोहीम चालली, पण साक्षीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली. पोलिसांनी लखनौव्यतिरिक्त बाराबंकी, सुलतानपूर, सीतापूर, रायबरेली आणि हरदोई यांसारख्या आसपासच्या जिल्ह्यांतही साक्षीचा शोध घेतला, पण काहीही हाती लागले नाही.
आईने केली एसआयटी चौकशीची मागणीसाक्षी आणि सचिन यांच्यात ज्या तिसऱ्या व्यक्तीवरून वाद झाला होता, तो साक्षीचाच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याचीही चौकशी केली आहे. दरम्यान, साक्षीच्या आईने या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा किंवा एसआयटी मार्फत करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून यामागचे सत्य समोर येईल. साक्षीच्या आईचा दावा आहे की, तिच्या मुलीचे अपहरण झाले आहे. तिने साक्षीचा मित्र सचिनवर तिला फसवल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.