मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल
By Admin | Updated: August 4, 2014 03:18 IST2014-08-04T03:18:01+5:302014-08-04T03:18:01+5:30
महागाई कमी करतो असे सांगत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. दोन महिन्यांत जनतेला कळून चुकले आहे

मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल
अकोला : महागाई कमी करतो असे सांगत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. दोन महिन्यांत जनतेला कळून चुकले आहे, की महागाई कमी करण्याचा भाजपाचा दावा अगदीच खोटा होता. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी अकोला येथे केली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली होती. लोकांना हे सत्य पटवून देण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढविला. जनतेची दिशाभूल करून मिळालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीच्या नेत्यांचे पाय जमिनीवर नाहीत. आतापासूनच त्यांचे ४ ते ५ नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. मंत्र्यांचा आकडा तर शंभराच्या घरात पोहोचला, अशा शब्दांत तटकरे यांनी महायुतीची खिल्ली उडवली.
महाराष्ट्राला आता गतीमान नेतृत्वाची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्रातील एकमेव गतीमान नेतृत्व आहे. त्यामुळेच त्यांना निवडून द्या, असे आवाहन मी करतो. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पवार यांच्या कामाचा ठसा आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी अजित पवार हेही उपस्थित होते.
जातीयवादी पक्षांना पराभूत करणे ही महाराष्ट्रासमोरील गरज आहे, असे सांगून तटकरे म्हणाले, भाजपा आणि शिवसेना हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यांना पराभूत करून महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पाया भक्कम केला पाहिजे.
महागाईपासून दिलासा मिळावा, यासाठी जनतेने मोदी सरकारला निवडून दिले; मात्र देशात महागाई वाढतच असून, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते, बियाणे यांचेही भाव गगनाला भिडले आहेत. १९७७ साली इंदिरा गांधींना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता; मात्र १९८० मध्ये त्यांनी पुन्हा सरकार स्थापन केले, याचे स्मरण अजित पवार यांनी करून दिले.