अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार
By Admin | Updated: January 3, 2015 02:45 IST2015-01-03T02:45:19+5:302015-01-03T02:45:19+5:30
उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार
बदायूँतील भयंकर घटना : उत्तर प्रदेशासह अवघा देश हादरला, दोन्हीही फरार कॉन्स्टेबल बडतर्फ, कठोर कारवाईचे संकेत
बदायूँ : उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर हे दोन्ही पोलीस फरार झाले आहेत. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या दोन्ही नराधम पोलिसांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच ठाण्याच्या एसएचओलाही निलंबित करण्यात आले आहे.
कॉन्स्टेबल वीरपालसिंग यादव आणि अवनीश यादव अशी या पोलिसांची नावे आहेत. ते बरेलीचे राहणारे आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर रोजी या अल्पवयीन मुलीचे तिच्या घरून अपहरण केले आणि तिला मुसाझाग पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लल्लन सिंग यांनी येथे पत्रकारांना दिली.
या पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून दोन्ही पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून पोलीस त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या पोलिसांनी पोलीस ठाण्यातच आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे मुलीने आपल्या जबावात म्हटले आहे.
पोलिसांवर कारवाईची गरज
अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सामुहिक बलात्कार होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बदायूँ जिल्ह्यात बलात्कार आपदा केंद्र स्थापन करायला पाहिजे आणि येत्या काही महिन्यांत असे केंद्र स्थापन करण्यात येईल. दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी पोलीस स्वत:च कायदा मोडत आहेत आणि लोकांवर अत्याचार करीत आहेत. अशा पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
याआधी दोन बहिणींच्या संशयास्पद मृत्यूने बदायूँ चर्चेत आले होते. बदायूँच्या काट्रा सादतगंज भागात दोन बहिणी एका झाडाला फाशी लावलेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या. आता ३१ डिसेंबरला ओनला भागातही बलात्काराची घटना घडली आहे.
रात्री ८ वाजता मी घरी एकटीच असताना दोन कॉन्स्टेबल कारने आल्याचे मी पाहिले. त्यांनी मला कारमध्ये बसण्यास सांगितले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांनी मला एका खोलीत ठेवले आणि नंतर दोघांनीही लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी मला माझ्या गावाजवळ आणून सोडले’, असे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या दोन्ही पोलिसांना तत्काळ अटक करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत. या दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.