दिल्लीत धावत्या गाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: December 11, 2015 15:52 IST2015-12-11T15:45:55+5:302015-12-11T15:52:17+5:30
दिल्लीत धावत्या गाडीमध्ये सहा नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

दिल्लीत धावत्या गाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - पश्चिम दिल्लीतील रानहोलामध्ये सहा नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर धावत्या गाडीमध्ये आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षांची ही पीडित तरुणी सातव्या इयत्तेत शिकत आहे. तरुणी सहा आरोपींमधील दोघाजणांना ओळखत होती. गुरुवारी ती त्यांच्यासोबत शाळेतून बाहेर पडली होती. अन्य आरोपी नंतर सहभागी झाले असे पोलिसांनी सांगितले.
ज्या गाडीमध्ये बलात्कार झाला ती गाडी कॉलसेंटरची होती. आरोपींपैकी एक जण कॉलसेंटरमध्ये नोकरी करतो. दिल्लीच्या रस्त्यावरुन ही गाडी पळवत असताना, पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॅनने या गाडीचा पाठलाग करुन मुलीची सुटका केली. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, रमेश, नरेंद्र, राहुल, संदीप आणि सूरज अशी त्यांची नावे आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन दिली. त्यावेळी आरोपींनी धावत्या बसमध्ये बलात्कार केला होता.