लष्करी छावणीवर हल्ला

By Admin | Updated: March 21, 2015 23:57 IST2015-03-21T23:57:04+5:302015-03-21T23:57:04+5:30

दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Military camps attacked | लष्करी छावणीवर हल्ला

लष्करी छावणीवर हल्ला

जम्मू : दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर देत हल्ल्यात सामील दोन्ही दहशतवाद्यांना यमसदनी धाडून त्यांचा हा डाव उधळला.
राज्यात भाजप-पीडीपी सरकारच्या स्थापनेनंतर शांतता नांदेल, अशी आशा असतानाच दहशतवाद्यांनी सतत दोन हल्ले करून आव्हान उभे केले आहे. कठुआ जिल्ह्यात शुक्रवारी आत्मघाती दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ३ पोलीस शहीद तर एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले होते. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सकाळी सुमारे ५.४५ वाजता मेशवाडा भागातील लष्करी छावणीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. हल्लेखोर आणि सुरक्षा दलात काही तास ही चकमक चालली. गोळीबार सुरू असताना तेथून जात असलेला एक नागरिक सायकलवरुन पडला आणि जखमी झाला. दरम्यान, मोहीम फत्ते झाली असून दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत दिली. आज हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कठुआ हल्ल्यातील हल्लेखोरांशी संबंध होता काय, हे आताच सांगणे कठीण असल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. या हल्ल्यात गोळी लागून कुणीही जखमी झालेले नाही.
हल्लेखोरांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला नाही. ते बाहेरूनच गोळीबार करीत होते आणि लष्करी क्षेत्राबाहेरच त्यांना घेरण्यात आले. खबरदारी म्हणून जम्म्ू-पठाणकोट महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

४जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचले आहे. ते उंचावण्याचा प्रयत्न या हल्ल्यांच्या माध्यमाने करण्यात आला. परंतु जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावला, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
४ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक नाले आहेत. त्यामुळे अनेकदा या भागात पाळत ठेवणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) देखरेख आहे.

Web Title: Military camps attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.