छत्तीसगडच्या बलौदाबाजार भागातील एका सरकारी शाळेने मोठाच प्रताप केला आहे. लहान मुलांसाठी बनविण्यात आलेले मिड डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले होते. शाळेने विरोध केला तरी बचत गटाने हे माहिती असूनही ते जेवण तसेच लहान मुलांना वाढले. या प्रकाराची वाच्यता होताच मोठी खळबळ उडाली, शिक्षण विभागापासून आरोग्य विभागापर्यंत चांगलीच धावपळ उडाली. अखेर या प्रकारीच विभागीय चौकशी सुरु केली असून ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली आहे.
शाळांमध्ये अनेक ठिकाणी मिड डे मील बनविण्याची जबाबदारी बचत गटाच्या महिलांकडे देण्यात आली आहे. २९ जुलैला हा प्रकार घडला आहे. लच्छनपूर सरकारी शाळेत त्या दुपारी बनविलेले जेवणातील भाजीच्या भांड्यात कुत्र्याने तोंड घातले होते. ते विद्यार्थ्यांनी पाहिले होते. त्यांनी ते आपल्या शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी ते जेवण मुलांना वाढण्यास नकार दिला होता. परंतू, ते जेवण बनविणाऱ्या बचत गटाच्या महिलांनी शिक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि विद्यार्थ्यांना तसेच वाढले. जवळपास ८४ विद्यार्थ्यांनी ते जेवण घेतले.
घरी येऊन मुलांनी आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा सर्वांनी शाळेकडे धाव घेतली आणि वाद सुरु झाला. अखेरीस हा प्रकार शिक्षण विभागाच्या कानावर गेला. तोवर पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रावर नेले होते. हा प्रकार आरोग्य विभागाकडे येताच मोठी खळबळ उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस देण्यात आली. याबरोबर अधिकारी शाळेत पोहोचले आणि चौकशी सुरु केली. परंतू, ज्या बचत गटाने ही अक्षम्य चूक केली ते चौकशीला आलेच नाहीत. परंतू, या निष्काळजी पणामुळे मिड डे मील पुन्हा एकदा वादात सापडले आहे.