मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
By Admin | Updated: June 29, 2017 00:35 IST2017-06-29T00:35:48+5:302017-06-29T00:35:48+5:30
राष्ट्रपतिपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी बुधवारी नामांकन अर्ज लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांच्याकडे सादर केला.

मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी बुधवारी नामांकन अर्ज लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांच्याकडे सादर केला. त्यांनी अर्जाचे चार सेट सादर केले. राष्ट्रपतिपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होत असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली.
या निवडणुकीत सत्ताधारी रालोआचे रामनाथ कोविंद व १७ विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार असा थेट सामना होणार आहे. मतांची संख्या पाहता कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याखेरीज रिंगणात ६२ उमेदवार आहेत. अर्जांची छाननी उद्या, गुरुवारी होणार आहे.
मीरा कुमार यांनी अर्ज सादर केला, तेव्हा त्यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, माकपचे सीताराम येचुरी, द्रमुकच्या कणीमोळी, सपाचे नरेश अग्रवाल, बसपाचे सतीश मिश्रा, बिहारचे राजदचे दोन मंत्री तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग, सिद्धरामय्या, वीरभद्र सिंग, व्ही. नारायणस्वामी हे काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. लालुप्रसाद यादव, अखिलेश यादव, मायावती, ममता बॅनर्जी यांनी आपले प्रतिनिधी पाठविले होते. राहुल गांधी परदेशात आहेत.
अर्ज सादर केल्यानंतर मीरा कुमार यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. आपले वडिल जगजीवन राम यांच्या समाधीवरही त्यांनी फुले वाहिली. त्या गुजरातमधील साबरमती आश्रमातून आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातून प्रचाराची सुरुवात करण्यामागे आपली लढाई वैचारिक आहे, हे दाखवण्याचा त्यांचा हेतू आहे.