वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा रद्द
By Admin | Updated: June 16, 2015 04:08 IST2015-06-16T04:08:26+5:302015-06-16T04:08:26+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संपूर्ण देशभर घेतल्या जाणाऱ्या आॅल इंडिया प्री मेडिकल अॅण्ड प्री-डेंटल एंटरन्स टेस्ट २०१५ (एआयपीएमटी)

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा रद्द
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संपूर्ण देशभर घेतल्या जाणाऱ्या आॅल इंडिया प्री मेडिकल अॅण्ड प्री-डेंटल एंटरन्स टेस्ट २०१५ (एआयपीएमटी)मध्ये कथितरीत्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ही परीक्षाच रद्द केली. शिवाय चार आठवड्यांत फेरपरीक्षा घेण्याचे आदेशही दिले. त्यामुळे सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
सीबीएसईने ३ मे रोजी संपूर्ण देशभर एआयपीएमटी घेतली होती. (पान ६ वर) या परीक्षेतील फुटलेले पेपर काही डॉक्टरांना मिळाल्याचे तसेच विविध राज्यांमधून ७५ मोबाइल फोनवरून १२३ प्रश्नांची आन्सर की प्रसारित झाल्याचे उघड झाले होते. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना याची उत्तरे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही परीक्षाच रद्द करावी अशी याचिका दाखल करण्यात आली. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. संंबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आर. के. अग्रवाल आणि न्या. अमिताव राय यांच्या सुटीकालीन पीठाने एआयपीएमटी रद्द करण्याचे आदेश दिले. परीक्षेबाबत ‘संशयाच्या घेऱ्यात’ आहे आणि अशास्थितीत कुठलीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. सीबीएसईने चार आठवड्यात फेरपरीक्षा घ्यावी. नव्याने परीक्षा आयोजित करण्यात वेळ जाईल, गैरसोयही होईल. पण परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी ही किंमत आपल्याला मोजावीच लागेल. परीक्षा आयोजित करणाऱ्यांनी आणि या परीक्षेला बसणाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते, मात्र अनुचित मार्गांनी लाभ प्राप्त करणाऱ्या मूठभर लोकांच्या प्रयत्नांनी संपूर्ण प्रक्रियाच व्यर्थ ठरवली. त्यामुळे एआयपीएमटी रद्द करण्याचा आदेश देताना आम्हाला कुठलाही संकोच वाटत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
यापूर्वी १२ जूनच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल रंजित कुमार यांनी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला होता. केवळ ४४ विद्यार्थी परीक्षेत गैरमार्गाने लाभ उठवताना दोषी आढळले आहेत. या ४४ विद्यार्थ्यांच्या कृत्यापोटी ६.३ लाख विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क )
फुटला होता पेपर, उत्तरपत्रिकाही मिळाल्या
-एआयपीएमटीत अनेक परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी पेपर फुटला होता.
-अनेक केंद्रांवर विद्यार्थी नक्कल करताना पकडले गेले होते. हरियाणाच्या रोहतक येथे पोलिसांनी काही आरोपींना परीक्षेच्या काही तास आधी उत्तरतालिकेसह अटक केली होती.
-अंतर्वस्त्रात मोबाइल चीप बसवून त्याद्वारे नक्कल करण्याची योजना असल्याचे अटक करण्यात आलेल्या या आरोपींनी सांगितले होते. मायक्रो ईअर फोन आणि डिजिटल वॉचचाही वापर होणार होता.