Mayawati-Akhilesh's alliance does not have any magic! BJP domination | लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व

लखनऊ : राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमधून पुढे आला होता. मात्र, केवळ २० जागांवरच मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसनेदेखील या ठिकाणी कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. मात्र, या ठिकाणी देखील रायबरेलीतून सोनिया गांधी या आघाडीवर असून, अमेठीतून राहुल गांधी मात्र पिछाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा येथे सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना निवडणूक प्रचारात उतरवूनदेखील फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसत आहे. हीच परिस्थिती सपा आणि बसपाची देखील आहे.


काही प्रमुख उमेदवार वगळता अनेक मातब्बर उमेदवारांनादेखील मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ५० पेक्षा अधिक जागा सपा-बसपाला मिळेल आणि ४० जागांवर भाजपला फटका बसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, भाजपने पुन्हा मुसंडी मारली असून, मतदारांनीदेखील भाजपच्याच बाजूने कौल दिला आहे. २०१४ मध्ये भाजपला मतदारांनी ७१ जागा भाजपला दिल्या होत्या. आता त्यात १२ जागा कमी झाल्या आहेत. मात्र, जे मुद्दे निवडणूक प्रचारात उपस्थित करण्यात आले होते. त्याचा मतदारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. विशेषत: गोहत्या, मॉब लिंचिंग, नोटबंदी, जीएसटी, तीन तलाक या कोणत्याही गोष्टींचा परिणाम मतदारांवर झालेला नाही. भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून सप व बसपने आघाडी केली होती.

योगी आदित्यनाथ
विरोधकांनी केलेले नकारात्मक पॉलिटिक्स जनतेने नाकारले. मोदी लाट होती. ती फक्त सुप्त होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशात आम्ही यश मिळविले आहे. या वेळी थोड्या जागा कमी झाल्या, तरी मतदार आमच्यासोबत आहेत.

प्रियांका गांधी

मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांचा फार परिणाम दिसला नाही. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि भाजप आणि मोदींचे अभिनंदन करतो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.


मायावती
सपा-बसपा यांनी गठबंधन केले. मात्र, त्याचा परिणाम मतांमध्ये होताना दिसला नाही. अखिलेश यादव आणि मायावती यांनी मागचे वैर विसरून केलेल्या आघाडीला मतदारांनी स्वीकारले नाही. त्यामुळेच या वेळी गठबंधन अयशस्वी ठरले आहे.


अखिलेश यादव
बहुजन समाज पक्षाला सोबत घेऊन मुसंडी मारता येईल, असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. मात्र, मतदारांनी पुन्हा भाजपलाच कौल दिला असून, आगामी काळात गठबंधन काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे.

निकालाची कारणे
पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहा यांची स्टॅटेजी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळेच मतांचे धु्रवीकरण झाल्याने भाजपला मुसंडी मारता आली.
प्रियांका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात उतरविले होते. मात्र, त्यांचीही जादू या ठिकाणी चालली नाही. जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला नाही.
मोदी सरकारने ५ वर्षे केलेले काम आणि लोकांशी असलेला संवाद ठेवला तो या वेळी कामी आला.

 

Web Title: Mayawati-Akhilesh's alliance does not have any magic! BJP domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.