Mahakumbh Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारला घेरलं आहे. अशातच मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी या चेंगराचेंगरीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ही घटना तितकी मोठी नाही. त्या घटनेबाबत वाढवून चढवून सांगितले जात आहे, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. हेमा मालिनी यांच्या या विधानावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला घेरलं आहे. तर दुसरीकडे भाजप डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांना महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत विचारले असता ही काही मोठी घटना नसल्याचे म्हटलं. हेमा मालिनी यांनी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना, महाकुंभ २०२५ साठी इतके लोक येत आहेत की त्यांचे व्यवस्थापन करणे कठीण आहे परंतु तरीही योगी सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. चेंगराचेंगरीची घटना एवढी मोठी घटना नव्हती, असं हेमा मालिनी म्हणाल्या.
"मी महाकुंभात गेले होते. आम्ही खूप छान आंघोळ केली. सगळं खूप छान झालं. ही घटना घडली जी खरी आहे पण तितकं मोठं काही घडलं नाही. घडलं पण ते किती मोठं आहे, ते काय आहे मला माहीत नाही. पण तिथे खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित केले आहे. सर्व काही खूप चांगले चालले आहे. घटना वाढवून चढवून सांगितली जात आहे,” असं हेमा मालिनी म्हणाल्या.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणार असल्याबाबत विचारले असता हेमा मालिनी यांनी, तिथे सर्व काही ठीक आहे त्यामुळे ते तिथे जात आहेत, असं म्हटलं.