काँग्रेसवरून मार्क्सवादीमध्ये तणाव, केंद्रीय समिती बैठक; दोन्ही गटांच्या प्रस्तावांंवर मतदान अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:55 IST2017-10-16T01:54:36+5:302017-10-16T01:55:04+5:30
लोकसभेच्या २0१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गांभीर्याने सुरू झाला आहे. दिल्लीत मार्क्सवादी पक्षाच्या मुख्यालयात दोन दिवसांपासून पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक सुरू असून....

काँग्रेसवरून मार्क्सवादीमध्ये तणाव, केंद्रीय समिती बैठक; दोन्ही गटांच्या प्रस्तावांंवर मतदान अपेक्षित
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - लोकसभेच्या २0१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गांभीर्याने सुरू झाला आहे. दिल्लीत मार्क्सवादी पक्षाच्या मुख्यालयात दोन दिवसांपासून पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक सुरू असून, त्यात काँग्रेससह अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवण्याच्या बाजूने आणि विरोधात येचुरी विरुध्द करात गटात ओढाताण सुरू आहे.
पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी विशाखापट्टणम येथे माकपने कोणत्याही स्थितीत भाजपा अथवा काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या भूमिकेत बदल करू नये, असे माजी महासचिव प्रकाश करात यांच्या गटाला आजही वाटते. मध्यंतरी १६ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत २0१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी इतर धर्मनिरपेक्ष पक्षांशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी मांडला. त्यात काँग्रेसचा थेटपणे उल्लेख नव्हता.
अंतिम निर्णय हैदराबादमध्ये
केंद्रीय समितीत येचुरी व प्रकाश करात असे दोन गट पडले असून, दोघांच्या परस्पर विरोधी प्रस्तावांवर सोमवारी बहुदा मतदान होण्याची शक्यता आहे. जो प्रस्ताव मंजूर होईल तो २0१८ सालच्या हैद्राबाद येथे होणाºया पक्षाच्या काँग्रेसपुढे मांडला जाईल व त्यावर साधक बाधक चर्चा होउन २0१९ च्या निवडणुकीबाबत पक्षाची अंतिम भूमिका ठरेल. तथापि सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय समितीत याच विषयावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे व बहुतांश सदस्य येचुरींच्या मताशी सहमत असल्याचे चित्र दिसते.