लग्नाची स्वप्ने अनेकजण पाहतात. अनेकांची लग्ने होतात. काही जण बिना लग्नाचेच राहतात. अनेकदा जोडीदाराकडून अपेक्षा खूप असतात, अनेकदा लग्नात फसवणूकही होते. लग्न म्हणजे आता एक आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा बनला आहे. आताची जोडपी टिकेल तोवर असा विचार मनात ठेवूनही संसार करत असतात. यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही खूप वाढले आहे. अनेकदा लग्नातच लग्ने मोडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील एका गावात असाच एक किस्सा घडला आहे. लग्नाची वरात आदल्यादिवशी वधुच्या गावी आली होती. सारेजण लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. आदल्यादिवशी थोडे विधी आणि दुसऱ्या दिवशी उरलेले असे लग्न करण्याचे ठरले होते. यामुळे आदल्यादिवशी लग्नाचे सर्व विधी उरकले, अक्षताही पडल्या, वरमाळाही पडली होती. दुसऱ्या दिवशी काही विधी उरकून नवरदेवाच्या घरी निघायचे होते. रात्रीपर्यंत सारे ठीक होते.
सकाळी वधुपक्षाच्या महिला मंडळींनी कुतुहलाने आदल्या दिवशी रात्री नवरीला नवरदेवाने घातलेले दागिने पाहिले आणि धक्काच बसला. त्यातल्या एकीने हे दागिने खोटे असल्याचे सांगितले अन् नवरीच्या डोळ्यावरची लग्नाची ग्लानी झटकन उतरली. तिने तिथेच बसकन मारली. नवरदेवाने लग्न लागल्यानंतर दारु पिली होती. ते देखील तिला समजले होते. दागिने खोटे, नवरदेव दारुडा यावरून तिने आपण नांदायला जाणार नसल्याचे सांगितले. तिच्यासोबत फसणवूक झाली होती.
अखेर वाद पोलिसांत पोहोचला सकाळचे विधी राहिले बाजुला संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यातच होते. अखेर नवरदेवाकडच्यांनी लग्नाचा सर्व खर्च भरून दिला तेव्हाच वाद मिटला. यानंतर तो बनावट दागिने देणारा नवरदेव रिकाम्या हातानेच परत माघारी परतला.
इकडे आदल्यादिवशी गावात वरात आली तेव्हा वधूपक्षाकडून मोठ्या धामधुमीत स्वागत करण्यात आले. गावातून वरात काढण्यात आली होती. जेवणावळीच्या पंगती उठल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वाद झाला तेव्हा वरपक्षानेच पोलिसांना बोलविले होते. तसेच नवरदेवाने वैद्यकीय चाचणी करण्यासही तयारी दर्शविली होती. परंतू, नवरीमुलगी नांदायलाच जाणार नाही असे सांगत अडून बसली.