आयकर विभागाकडून दोन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. यात, SVC, मॅथ्री मूव्ही मेकर्स आणि मँगो मीडिया आदी प्रमुख फिल्म प्रोडक्शन हाऊसेसच्या परिसरात चौकशी केली जात आहे. या फिल्म हाऊसेसअंतर्गत सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारात आणि टॅक्स रिटर्न्ससंदर्भात अनियमितता आढळून आल्यानंतर, ही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर अधिकाऱ्यांच्या मते, या चौकशीचा उद्देश अन-रिपोर्टेड व्यवहार आणि टॅक्सशी संबंधित घोटाळ्यांचा पर्दाफाश करणे, असा आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाय-प्रोफाइल चित्रपटांचे, प्रामुख्याने 'पुष्पा २' आणि इतर काही प्रमुख चित्रपटांचे बजेट आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटांमध्ये काही करचोरी झाली आहे का? हे शोधण्यासाठी संबंधित विभाग या चित्रपटांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत असल्याचे मानले जाते. कारण पुष्पा २ सारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये व्यापक आर्थिक व्यवहार होत असतात.
आयटी रिटर्न्समध्ये वसंगती आढळल्याने कारवाई -आयकर रिटर्नमध्ये विसंगती आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, काही आर्थिक व्यवहार लपवले गेल्याचे या विसंगतींवरून दिसून येते. विभागाच्या या छाप्याचा उद्देश बेकायदेशीर पैसा शोधणे आणि करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये कारवाई करणे, असा आहे.
आयकर विभागाच्या छापेमारीने चित्रपटसृष्टीत खळबळ -आयकर विभागाच्या या कारवाईमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तपासाच्या पुढच्या टप्प्यात, चित्रपटांशी संबंधित इतरही काही प्रोडक्शन हाऊसेस आणि आर्थिक बाबींची चौकशी होऊ शकते. महत्वाचे म्हणजे, कुठलीही बेकायदेशीर कृती आढळली, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.