आम आदमी पक्षाच्या पुजारी-ग्रंथी सन्मान योजनेवरून राजकारण सुरू झालं आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मरघट बाबा मंदिरात पोहोचून स्वतः पुजाऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून या योजनेला सुरुवात केली. मात्र या योजनेवरून आता भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी केजरीवालांना घेरलं आहे. एक व्हिडीओ शेअर करून निशाणा साधला आहे.
मनोज तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये पुजारी केजरीवाल यांच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश करत असल्याचा दावा मनोज तिवारी यांनी केला आहे. तिवारी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक पुजारी म्हणत आहे की, "इतक्या घोषणांनंतरही तिजोरी उघडी पडल्यासारखं वाटत आहे."
"मी केजरीवालांना विनंती करतो की, आधी यमुना स्वच्छ करा. आज आपण यमुना पूल ओलांडतो तेव्हा तिथल्या दुर्गंधीतून जाणं कठीण होऊन बसतं. बाईकवरून प्रवास करताना श्वास घेणंही कठीण होतं. यमुनेला स्वर्ग बनवण्याचं त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करण्याची आठवण करून द्यावीशी वाटते."
"मला तुमचे १८ हजार रुपये नको आहेत. आम्हाला तुमचे पैसे नको आहेत. पंजाबमध्ये तुमचं सरकार आहे, पण तुम्ही आश्वासनानुसार रक्कम देऊ शकत नाही. दिल्लीत अशाप्रकारच्या किती घोषणा होतील? आता जनतेला सर्व काही समजलं आहे. तुमचा वेळ संपला आहे. खूप झालं, आता दुसरं कोणाला तरी येऊ द्या." अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत पुजाऱ्यांना दरमहा मानधन देण्याची तरतूद आहे.