गोव्यात मनोहर पर्रिकरांनी जिंकली बहुमताची कसोटी

By Admin | Updated: March 16, 2017 13:12 IST2017-03-16T10:52:45+5:302017-03-16T13:12:09+5:30

दोन दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणा-या मनोहर पर्रिकरांनी आज अखेर बहुमताची कसोटी जिंकली.

Manohar Parrikar won the match in Goa | गोव्यात मनोहर पर्रिकरांनी जिंकली बहुमताची कसोटी

गोव्यात मनोहर पर्रिकरांनी जिंकली बहुमताची कसोटी

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - दोन दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणा-या मनोहर पर्रिकरांनी आज अखेर बहुमताची कसोटी जिंकली. गुरुवारी सकाळी त्यांनी गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध केले. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. 13 जागा जिंकणा-या भाजपाने अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांनी मोट बांधून बहुमत सिद्ध केले. गोव्यात सर्वाधिक 17 जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 
 
गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा (17) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा करता आला नाही, तर केवळ 13 जागा जिंकूनही राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण दिले, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे याकडे देशाचं लक्ष लागलं होत. 
 
40 सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण 22 आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे 13 आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याबाबतची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली. राजभवनवर त्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. अन्य मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नसल्याने त्यांनी केबिनचा ताबा घेतलेला नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर आपण खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बुधवारी सकाळी येथील काँग्रेस हाउसमध्ये बैठक झाली. पर्रीकर सरकार अल्पमतात कसे आणता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी दिगंबर कामत व विश्वजीत राणे या आमदारांकडे काँग्रेसने मगोपला व अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना भाजपपासून अलग करून काँग्रेससोबत आणण्याची जबाबदारी सोपवली होती; पण मगोपने व खंवटे यांनीही काँग्रेसच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसनेही प्रयत्न सोडून देऊन विरोधी बाकांवर बसण्याची तयारी केली आहे. पर्रीकर सरकारचे आसन घट्ट झाल्यानंतर काँग्रेसमध्येच फूट पडू शकते व आमदार विश्वजीत राणे फुटू शकतात, अशी चर्चा आहे.
 
 
काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, पक्षाने गोव्याच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. 
 
 
   

Web Title: Manohar Parrikar won the match in Goa