मणिपूर पुन्हा भूकंपाने हादरले, ६ ठार तर १०० जखमी
By Admin | Updated: January 4, 2016 11:25 IST2016-01-04T07:44:30+5:302016-01-04T11:25:03+5:30
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी पहाटेच्या सुमारास पूर्व व ईशान्य भारत हादरलेला असतानाच मणिपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले.

मणिपूर पुन्हा भूकंपाने हादरले, ६ ठार तर १०० जखमी
>नलाइन लोकमत
नवी दिल्ली, ४ - भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी पहाटेच्या सुमारास पूर्व व ईशान्य भारत हादरलेला असतानाच मणिपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत ६ जण ठार तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. आज पहाटे भारत-म्यानमार सीमेवर बसलेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. तर साडनेऊच्या सुमारास मणिपूरमध्ये पुन्हा झालेल्या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे घरांना तडे जाऊन खांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून मणीपूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले तर इंफाळमध्ये ३५ जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत भूकंपग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच या परिस्थितीचा व झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली.
दरम्यान भूकंपातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी शहरातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदतकार्यासाठी NDRFची टीम इंफाळला रवाना झाली आहे.
आज पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इंफाळपासून ३३ कि.मी दूर असल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड राज्यासह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बांगलादेश, म्यानमारमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे इम्फाळमध्ये अनेक घरांचे मोठं नुकसान झाले असून भिंतीनाही तडे गेले. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच घाबरलेले नागरिक घराबाहेर पडून रस्त्यांवर एकत्रित आल्याचे चित्र अनेक ठिताणी दिसत होते.