भाजपा-शिवसेनेत पुन्हा रंगणार ‘मानापमान’ नाट्य
By Admin | Updated: October 20, 2014 06:10 IST2014-10-20T06:10:03+5:302014-10-20T06:10:03+5:30
आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही.

भाजपा-शिवसेनेत पुन्हा रंगणार ‘मानापमान’ नाट्य
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
निवडणुकीआधी युती तुटली असली तरी आता महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पुन्हा शिवसेनेला बरोबर घ्यावे, असे मत ‘अडगळीत’ गेलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा त्यासाठी तयार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही.
आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही. दुसरे असे की, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून बाहेरून पाठिंब्याची तयारी दर्शविली असल्याने भाजपाचे काम काही प्रमाणात सोपेही झाले आहे.
आडवाणी यांचा सल्ला ऐकून पाठिंब्यासाठी शिवसेनेपुढे स्वत:हून हात पसरण्यास भाजपाचे पक्षनेते राजी नसण्याचे प्रमुख कारण निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून मोदी यांच्याविरुद्ध गरळ ओकली जाणे हे आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या नितांत आदरापोटी आपण प्रचारात शिवसेनेविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही, असे मोदी यांनी सांगितले असले तरी पक्षातील इतर नेत्यांनी ही मर्यादा पाळलेली नाही. मतदानाच्या काही दिवस आधी ‘दोपहर का सामना’मध्ये मोदींच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करून केले गेलेले विखारी लिखाण भाजपाचे नेते विसरलेले नाहीत. यावरून आलेली कटुता दूर झाली नसल्याने शिवसेनेला पुन्हा खुल्या दिलाने मिठी मारण्यावरून या नेत्यांच्या मनात किंतु आहे. शिवसेनेने असे जाहीरपणे वक्तव्य केल्यानंतर आम्ही स्वत:हून का हात पसरवावे, असे मोदी-शहा गटाचे कट्टरपंथी विचारत आहेत.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले नसले तरी ‘आम्ही नव्हे तर त्यांनीच केवळ तीन जागांसाठी युती तोडली’ हे सांगतानाच त्यांचा रोख याकडेच संकेत करणारा
होता. (प्रतिनिधी)