ट्रेनमध्ये शाकाहारींसाठी असावी वेगळी जागा, गुजरात हायकोर्टात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 12:04 PM2018-09-30T12:04:13+5:302018-09-30T12:19:40+5:30
रेल्वेमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था असावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
गांधीनगर - शाकाहार आणि मांसाहार यावरून याआधी अनेकदा वाद झाले आहेत. मात्र आता रेल्वेमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था असावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अहमदाबादमधील खानपुरचे निवासी असलेल्या ई. ई. सैय्यद या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सैय्यद यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रिये दरम्यानच शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच अशी व्यवस्था केल्याने शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींपैकी कोणाचीही गैरसोय होणार नाही, असं सैय्यद यांनी म्हटलं आहे.
गुजरात उच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा वाद होतात. त्यामुळे कुणा एकाची गैरसोय ही ठरलेली असते. त्यामुळेच रेल्वेत आपल्या निवडीचे भोजन मिळणे, हा प्रत्येक प्रवाशाचा अधिकार आहे. तसेच ही याचिका दाखल करण्यामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप नसून केवळ चांगला हेतू असल्याचं ही सैय्यद यांनी म्हटलं आहे.