ममतांच्या पेंटिंगकडे सीबीआयची वक्रदृष्टी
By Admin | Updated: October 15, 2014 03:35 IST2014-10-15T03:35:09+5:302014-10-15T03:35:09+5:30
शारदा घोटाळ्याचा तपास करीत असलेल्या सीबीआयने आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे़

ममतांच्या पेंटिंगकडे सीबीआयची वक्रदृष्टी
नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याचा तपास करीत असलेल्या सीबीआयने आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे़ शारदा ग्रुपचा प्रमोटर असलेल्या सुदीप्त सेनने ममता बॅनर्जी यांनी काढलेले एक पेंटिंग १़८ कोटी रुपये मोजून विकत घेतले होते़ सीबीआयने यासंदर्भात आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे़
सीबीआयच्या माहितीनुसार, शारदा घोटाळ्याप्रकरणी ममतांचे विश्वासू आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल राय यांना दिवाळीनंतर चौकशीसाठी बोलविण्याचीही सीबीआयची योजना आहे़ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांच्या पेंटिंगचा मुद्दा छेडला होता़ ममतांचे एक पेंटिंग १़८ कोटी रुपयांना विकले गेले, असा आरोप त्यांनी केला होता़ सुदीप्त सेनने ममतांचे कुठलेही पेंटिंग खरेदी केल्याचा इन्कार केला होता़ मात्र, तृणमूल काँग्रेसने आयकर विभागाकडे भरलेल्या रिटर्नमधून शारदा ग्रुपने ममतांचे एक पेंटिंग खरेदी केल्याचे स्पष्ट होत आहे़ ममतांच्या पेंटिंगच्या प्रदर्शन स्थळावरही खूप मोठा खर्च झाल्याचे यातून दिसत आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)