माल्या म्हणतो, भारतात कारागृहे खराब...
By Admin | Updated: July 8, 2017 14:39 IST2017-07-08T14:39:27+5:302017-07-08T14:39:27+5:30
भारतातील कारवाई चुकवण्यासाठी इंग्लंडला पळून गेलेल्या विजय माल्या आता रोज नवी कारणे पुढे करत प्रत्यार्पणाला विरोध करत आहे.

माल्या म्हणतो, भारतात कारागृहे खराब...
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि.8- भारतातील कारवाई चुकवण्यासाठी इंग्लंडला पळून गेलेल्या विजय माल्या आता रोज नवी कारणे पुढे करत प्रत्यार्पणाला विरोध करत आहे. भारताने इंग्लंडकडे केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा निकाल आता आपल्याविरोधात जाण्याची चिन्हे दिसताच आता भारतातील कारागृहे चांगल्या स्थितीत नाहीत असे कारण त्याने पुढे केले आहे. भारतातील कारागृहे अत्यंत खराब असल्यामुळेही आपण प्रत्यार्पणाला विरोध करत आहोत अशी वेन्स्टमिनिस्टर कोर्ट येथे सुरु असलेल्या कारवाईत माल्याच्या वकिलांनी बाजू मांडली आहे.
कारागृहांच्या स्थितीच्या मुद्याचे माल्या कोर्टात प्रत्यार्पणाविरोधात भांडवल करेल म्हणून केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी महाराष्ट्रातील कारागृहांच्या स्थितीबाबत चौकशी करणारे पत्र राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांना पाठवले होते. माल्याचे प्रत्यार्पण झाल्यावर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. या पत्रात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. भारतीय बॅंकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये गेलेल्या विजय माल्याला तुम्ही भारताच्या न्यायव्यवस्थेपासून का दूर पळून आलात असे कोर्टाने विचारल्यावर मी 1992 पासून इंग्लंडमध्ये राहात आहे असे उत्तर माल्याने दिले होते.
विजय माल्याने मागील महिन्यात चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत - पाकिस्तान सामन्यालाही उपस्थिती लावली होती आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिले. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं होतं.