न्यायालयाच्या अवमानाबद्दल मल्ल्या दोषी
By Admin | Updated: May 10, 2017 02:56 IST2017-05-10T02:56:49+5:302017-05-10T02:56:49+5:30
किंगफिशर एअरलाइन्स’ या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ९,००० कोटी रुपयांची कर्जे

न्यायालयाच्या अवमानाबद्दल मल्ल्या दोषी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘किंगफिशर एअरलाइन्स’ या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल दोषी ठरविले आणि याबद्दल शिक्षा सुनावण्यासाठी मल्ल्या याने १० जुलै रोजी जातीने न्यायालयात हजर व्हावे, असा आदेश दिला.
मल्ल्याकडून बुडित कर्जांच्या वसुलीसाठी मूळ याचिका केलेल्या बँक समूहाने केलेली अवमानना याचिका मंजूर करून न्या. ए.के. गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अर्थात, आम्ही हा आदेश देत आहोत, पण मल्ल्याला कोर्टापुढे आणणार कसे, असा सवालही खंडपीठाने सरकारला केला. त्यावर ब्रिटनमधून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे सरकारने सांगितले. मल्ल्या याने त्याच्या कंपनीचा व मालमत्तांचा तपशील द्यावा, असा आदेश दिला होता.