व्यापा-याचा 'गेम' करण्याआधीच 'डॉन'च्या 4 शार्पशूटर्सना अटक
By Admin | Updated: February 26, 2017 13:31 IST2017-02-26T13:31:29+5:302017-02-26T13:31:29+5:30
गुजरातच्या राजकोटमधून पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 4 शार्पशूटर्सना अटक केली, अटक करण्यात आलेले आरोपी महाराष्ट्रातील

व्यापा-याचा 'गेम' करण्याआधीच 'डॉन'च्या 4 शार्पशूटर्सना अटक
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 26 - गुजरातच्या राजकोटमधून पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 4 शार्पशूटर्सना अटक केली आहे. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने जामनगर येथील एका व्यावसायिकाची हत्या करण्याची सुपारी त्यांना दिली होती.
हे चारही आरोपी शिर्डीहून राजकोटला एका खासगी बसने येणार अशल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राजकोटच्या 30 किलोमीटरआधी कुवाडवा पोलीस स्थानकाजवळ बस थांबवून सर्च ऑपरेशन केलं असता बसमधून चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 पिस्तुल , 6 काडतुस, दोन चाकू, गाडीच्या काही नंबर प्लेट, 6 मोबाइल फोन आणि सिम कार्ड्स जप्त केले आहेत. चौकशी केल्यानंतर जामनगर येथील जहाज व्यवसायिक अशफाक खत्री यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं वृत्त आहे. रामदास रहाणे, विनीत कुंडलीक, संदीप दयानंद आणि अनिल धिल्लोड अशी त्यांची नावं आहेत.
चौकशीदरम्यान, एक आठवड्यापूर्वी राजकोट आणि जामनगरला येऊन अशफाक खत्री यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केल्याचं त्यांनी कबूल केलं.