प्राणायाम करा तणाव पळवा
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:46+5:302015-02-16T21:12:46+5:30
फोटो - रॅपमध्ये

प्राणायाम करा तणाव पळवा
फ टो - रॅपमध्ये नरेंद्र भुसारी : परीक्षेपूर्व तयारीवर मार्गदर्शननागपूर : परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिक तणावात असतात. तणावामुळे परीक्षेची संपूर्ण तयारी झाल्यानंतरही पेपर सोडविताना गोंधळतात. परिणामी निकालात गुणांची टक्केवारी कमी होते. विद्यार्थ्यांनो नियमित अभ्यास करीत असाल, तर टेन्शन घेऊ नका, प्राणायाम करा, रिलॅक्स राहा आणि यशाचा मार्ग सुकर करा, असा मोलाचा सल्ला डॉ. नरेंद्र भुसारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. मैत्री परिवार संस्था, एनआरएस मोटिव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगरातील विष्णुजी की रसोई येथे १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेची पूर्वतयारी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव कसा घालवाल, रिलॅक्स होण्याच्या पद्धती, पेपर सोडविण्याच्या पद्धती व वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. परीक्षेच्या काळात कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही म्हणून अभ्यास मन लावून करावा. तरीही अभ्यास झाला नसेल तर जेवढा अभ्यास होईल, तो पूर्ण झाला हे समजून परीक्षा द्यावी. परीक्षेच्या वेळी मित्राबरोबर अभ्यासाच्या तयारीची चर्चा करू नये, त्यामुळे मन विचलित होते, झालेली तयारी विसरल्या जाऊ शकते. पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्रातून थेट घरी जावे, झालेल्या पेपर्स विषयी चर्चा न करता, पुढच्या पेपरची तयारी करावी. अभ्यास करताना, परीक्षेपूर्वी प्राणायाम करून, स्वत:ला तणावमुक्त ठेवता येऊ शकते व अभ्यासही छान होतो, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. परीक्षेला जाताना हलके जेवण घ्यावे, आहारात फळे, सलाद व ज्यूसचा वापर करावा. रात्री उशिरा जेवण करू नये, त्यामुळे आळस येते व अभ्यासात लक्ष लागत नाही. १५ मिनिटात २ ते ३ तासांच्या झोपेचा अनुभव कसा घेता येईल, याचेही तंत्र शिकविण्यात आले.