क्रूरकर्मा शत्रुघ्न मेश्रामची फाशी कायम करा
By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30
शासनाची हायकोर्टास विनंती : चिमुकल्या भाचीचा अत्याचार करून खून

क्रूरकर्मा शत्रुघ्न मेश्रामची फाशी कायम करा
श सनाची हायकोर्टास विनंती : चिमुकल्या भाचीचा अत्याचार करून खूननागपूर : दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सादर केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी सोमवारी आरोपीला नोटीस बजावून १४ सप्टेंबरपर्यंत वकिलामार्फत उपस्थिती दर्शविण्याचे निर्देश दिलेत. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. आरोपी हा संबंधित मुलीचा चुलत मामा असून तो झटाळा ता. घाटंजी येथील रहिवासी आहे. गेल्या १४ ऑगस्ट रोजी यवतमाळ सत्र न्यायालयाने आरोपीला दुहेरी फाशी व दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीने हे माणुसकी व नात्याला काळीमा फासणारे कुकृत्य केले. त्या दिवशी संबंधित मुलीचे आई-वडील तिला गावातच राहणाऱ्या आजोबांकडे ठेवून मंदिरात महाप्रसादासाठी गेले होते. दरम्यान, शत्रुघ्न तिला आई-बाबा घरी आल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. अर्ध्या तासाने आजोबा तिच्या घरी गेले असता ती घरी आली नसल्याचे कळले. जवळपास विचारपूस केली असता शत्रुघ्न तिला घेऊन अंगणवाडीकडे गेल्याचे समजले. वडील व आजोबाने अंगणवाडी गाठली असता तेथे ही चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. शत्रुघ्न तिच्या बाजूला पडलेला होता. चिमुकलीला बेशुद्धावस्थेत कुर्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारवा पोलिसांनी वडिलाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, खून व लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. तपासानंतर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने वडील, आजोबा, डॉक्टर यांच्यासह १३ साक्षीदार तपासले होते.---------------------------चौकट.....अशी आहे आरोपीची शिक्षायवतमाळ सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. चाफले यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३७६ (अ) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३७६(१)(२)(फ)(आय)(एम) अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ६ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.