आँग सॅन सू की यांचा पक्ष बहुमताकडे
By Admin | Updated: November 9, 2015 22:52 IST2015-11-09T22:52:19+5:302015-11-09T22:52:19+5:30
म्यानमारमधील ऐतिहासिक निवडणुकीत आँग सॅन सू की यांचा पक्ष (नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी) बहुमताच्या दिशेने आगेकूच करीत असल्याने

आँग सॅन सू की यांचा पक्ष बहुमताकडे
यांगोन : म्यानमारमधील ऐतिहासिक निवडणुकीत आँग सॅन सू की यांचा पक्ष (नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी) बहुमताच्या दिशेने आगेकूच करीत असल्याने म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाची घोडदौड पाहून सत्तारूढ आणि लष्कर समर्थक युनायटेड सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाने पराभव कबूल केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील ४९८ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. जवळपास ८० टक्के मतदान झाले होते.
निवडणूक आयोगाने आतापर्यंत घोषित जागांच्या निकालापैकी सर्वाधिक जागा आँग सॅन सू की यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत. संसदेच्या फक्त ७५ टक्के जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
एक चतुर्थांश जागेवर लष्करी अधिकारी नामनिर्देशित केले जातील. बहुमतासाठी आँग सॅन सू की यांच्या पक्षाला ६७ टक्के जागा जिंकाव्या लागतील. १९९० मध्ये सू की यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती; परंतु लष्कराने निकाल अमान्य करीत त्यांना २० वर्षे नजरकैदेत ठेवले होते.