ईशान्य भारतातील छोट्या राज्यांपैकी एक असलेल्या मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, राज्यातील सरकारमधील १२ मंत्र्यांपैकी ८ जणांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांपैकी बहुतांश आमदार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. एनपीपीच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक आघाडी सरकारचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या उपस्थितीत सर्व मंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. मंत्रिमंडळातील फेरबदल आणि नव्या मंत्र्यांना संधी देणं हे या राजीनाम्यामागचं कारण असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, कोनराड संगमा हे काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित आहेत. त्यासाठी विद्यमान मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजीनामा दिलेले आमदार आता पक्षसंघटनेमध्ये काम करतील. मंत्रिमंडळात सहभागी झालेले नवे आमदार मंगळवारी संध्याकाळी शपथ घेतील. यामध्ये भाजपाच्या कोट्यातील मंत्र्यांचाही समावेश आहे.
राजीनामा दिलेल्या आठ मंत्र्यांमध्ये एनपीपीचे अम्पारीन लिंगडोह, कॉमिंगोन यम्बोन, रक्कम ए संगमा, आणि अबू ताहिर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगडोह आणि किरमेन शायला, एचएसपीडीपीचे शकलियार वारजरी आणि भाजपाचे ए. एल हेक यांचा समावेश आहे. मेघालयमध्ये विधानसभेचे ६० सदस्य असून, नियमानुसार येथे मंत्रिमंडळात १२ हून अधिक मंत्री असू शकत नाही.