श्रीनगर : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापे मारले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
मंगळवारी पहलगामच्या बैसरान खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्याची जबाबदारी दी रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे. तिला पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा भारताचा आरोप आहे. दहशतवाद्यांच्या साथीदारांना जेरबंद करण्यात आले. शनिवारी श्रीनगरमधील सौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये छापे टाकण्यात आले. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.
या कारवाईत आतापर्यंत ४४६ पेक्षा जास्त लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करणे, तसेच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे हा या कारवाईचा उद्देश आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असून, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे कळते.
महाराष्ट्रात ५५ पाकिस्तानी शॉर्ट टर्म व्हिसावर; त्यांनाच सोडावा लागणार देश; गृहखात्याने केले स्पष्ट१. शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात आलेले ५५ पाकिस्तानी नागरिक सध्या महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडून जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्यात १९, नागपूर- १८, जळगाव- १२, पुणे ३ आणि नवी मुंबई, मुंबई व रायगडमध्ये या व्हिसावर आलेले प्रत्येकी एक नागरिक आहे.२ . केंद्रीय गृहमंत्रालयाने जो आदेश भारतातील पाकिस्तानी नागरिकांबाबत काढला आहे तो केवळ शॉर्ट टर्म व्हिसाधारकांसाठी आहे, असे गृहखात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले. लाँग टर्म व्हिसा, डिप्लोमॅटिक व्हिसा आणि ऑफिशियल व्हिसाधारकांसाठी हा आदेश नाही. लाँग टर्म व्हिसावर भारतात आलेले बहुतेक हिंदू आहेत. त्यात सिंधी, पंजाबी बांधवांचा प्रामुख्याने समावेश आहे.
काश्मीरमध्ये सक्रिय सहा दहशतवाद्यांची सहा घरे उद्ध्वस्त
जम्मू : पहलगाममधील हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या तीन जिल्ह्यांमध्ये लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांवर कारवाई करत त्यांची आणखी चार घरे स्फोटकांनी उडवून दिली. ते दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. अशा प्रकारे केवळ २४ तासांत सहा दहशतवाद्यांची सहा घरे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी बुलडोझर वापरलेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.