Defence Ministry: भारतीय संरक्षण मंत्रालयातील उत्पादन विभागात लाचखोरीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले असून, सीबीआयने लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्यासह विनोद कुमार नावाच्या एका खाजगी व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईत सीबीआयने कोट्यवधींची रोकड जप्त केली असून, या रॅकेटचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहचले असल्याचे समोर आले आहे.
लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा हे नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयांतर्गत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात विभागात उपनियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर एका दुबईस्थित कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने या कंपनीच्या सांगण्यावरून ३ लाख रुपयांची लाच दीपक शर्मा यांना दिली होती. या गुप्त माहितीच्या आधारे सीबीआयने १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आणि तातडीने कारवाई सुरू केली.
धाडीत सापडला पैशांचा डोंगर
सीबीआयने या प्रकरणी दिल्ली, श्रीगंगानगर, बेंगळुरू आणि जम्मू अशा विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. या धाडींदरम्यान सीबीआयला मिळालेले यश थक्क करणारे आहे. लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांच्या दिल्लीतील घरातून लाचेची ३ लाख रुपये आणि अतिरिक्त २ कोटी २३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील घरातून १० लाख रुपये रोख आणि इतर अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तर नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातही सीबीआयची तपासणी सुरू आहे.
पत्नीवरही सीबीआयची नजर
या खळबळजनक प्रकरणात लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांचेही नाव समोर आले आहे. काजल बाली या सध्या राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे १६ इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटच्या कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारात सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुबई कनेक्शन समोर
प्राथमिक तपासानुसार, दुबईस्थित एका कंपनीला संरक्षण क्षेत्रातील व्यवहारात मदत करण्यासाठी ही लाचखोरी सुरू होती. या रॅकेटमध्ये अजून किती लष्करी अधिकारी किंवा मध्यस्थ सामील आहेत, याचा तपास आता सीबीआय करत आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Lieutenant Colonel Deepak Sharma arrested by CBI for taking bribes to favor a Dubai-based firm. Raids uncovered ₹2.33 crore in cash. His wife, Colonel Kajal Bali, is also under investigation. Dubai connection exposed.
Web Summary : लेफ्टिनेंट कर्नल दीपक शर्मा दुबई की कंपनी को फायदा पहुंचाने के लिए रिश्वत लेते गिरफ्तार। छापेमारी में 2.33 करोड़ रुपये नकद बरामद। पत्नी कर्नल काजल बाली भी जांच के दायरे में। दुबई कनेक्शन सामने आया।