West Bengal Blast: पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात सोमवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. आणखी एका जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत हे एकाच परिवारातील आहेत. मोठ्या स्फोटाच्या आवाजानंतर आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील पाथर प्रतिमा परिसरात सोमवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. पाथर प्रतिमा ब्लॉकच्या ढोलाघाट गावात रात्री नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्राथमिक तपासादरम्यान दोन गॅस सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे घरात ठेवलेले फटाके जळून खाक झाले आणि आग वेगाने पसरली. घरात फटाके बनवण्याचा अवैध धंदा सुरू होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ज्या घरात हा स्फोट झाला त्या घरात अनेक वर्षांपासून फटाके बनवले जात होते. सोमवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला, त्यानंतर आग लागली. या कुटुंबात एकूण ११ सदस्य होते. त्यापैकी चार अजूनही बेपत्ता आहेत. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक चंद्रकांत नावाच्या व्यक्तीच्या घरातून मोठा आवाज आला. काही वेळातच घरातून ज्वाळा उठू लागल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला.