महाराष्ट्र सदनातील ‘दारू’कामाची चौकशी
By Admin | Updated: July 30, 2014 01:41 IST2014-07-30T01:41:02+5:302014-07-30T01:41:02+5:30
हाराष्ट्र सदनातील खासदारांनी आणलेल्या मद्यसाठय़ाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली असून सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय त्याची चौकशी करणार आहेत.

महाराष्ट्र सदनातील ‘दारू’कामाची चौकशी
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील खासदारांनी आणलेल्या मद्यसाठय़ाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली असून सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय त्याची चौकशी करणार आहेत.
‘लोकमत’मध्ये मंगळवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिव ज. स. सहारिया यांना दिले. त्यानुसार मुख्य सचिवांनी सहाय यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली.
चपाती प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोव:यात सापडलेले महाराष्ट्र सदन या ‘दारू’कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या पंचेचाळीस दिवसांत कोणत्या खासदाराने किती ‘दारू’गोळा आपल्यासोबत आणला ते सदनातील स्कॅनरमध्ये चित्रबद्ध झाले आहे. अशा सुमारे दोनशे चित्रफिती व्यवस्थापनाने गोळा केल्या आहेत. शासकीय इमारतीत मद्य सेवन करण्यावर बंदी असताना या खासदारांनी सदनात मद्य का आणले, असा प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. (विशेष प्रतिनिधी)