मोदींविरोधात मुलायम, लालू आणि नितीश यांचा 'महामोर्चा'
By Admin | Updated: November 6, 2014 15:51 IST2014-11-06T15:48:24+5:302014-11-06T15:51:25+5:30
समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल संयुक्त या तिघांनी केंद्र सरकारविरोधात 'महामोर्चा' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदींविरोधात मुलायम, लालू आणि नितीश यांचा 'महामोर्चा'
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात प्रभाव वाढत असल्याने दुभंगलेला जनता दल आता एकत्र आला आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल संयुक्त या तिघांनी केंद्र सरकारविरोधात 'महामोर्चा' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव दिवसेगणिक वाढत असून हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याचे परिणामही दिसून आले आहे. आगामी वर्षांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त या तिन्ही पक्षांचे धाबे दणाणले आहेत. भाजपाविरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे तिन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत.
शुक्रवारी दिल्लीत मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लालूप्रसाद यादव, जदयूचे नेते शरद यादव, नितीश कुमार, जनता दल सेक्युलरचे नेते एच. देवेगौडा हे उपस्थित होते. हे सर्व पक्ष पूर्वी जनता दलाचे भाग होते. आता मोदींच्या विरोधात लढा देण्यासाठी या सर्वांनी मिळून 'महामोर्चा' सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भविष्यात सर्व सुरळीत राहिले तर सर्व पक्षांचे विलीनीकरण करुन नव्याने जनता दलाची निर्मिती होऊ शकेल असे सूचक विधान या पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.
काळा पैसा, बेरोजगारी आणि शेतक-यांचे प्रश्न या तिन प्रमुख मुद्द्यांवरुन आम्ही मोदी सरकारला धारेवर धरु अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करु असे त्यांनी आवर्जून सांगितले.