प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घाटसिलाच्या मुसाबनी ब्लॉकमधील शिवराज गुप्ता (५८) यांचा मृत्यू झाला. शिवराज गुप्ता हे मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मित्रांसह स्नान करण्यासाठी गेले होते. या टीममध्ये पुरुष आणि महिला असे एकूण १६ सदस्य होते. यामध्ये त्यांच्या साथीदारांच्या कुटुंबियांचाही समावेश होता, तर शिवराज गुप्ता त्यांच्या कुटुंबातील एकटे होते.
बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवराज यांच्या पत्नी पूनम राज यांना घटनेची माहिती मिळाली. पूनम यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांचं पतीशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. त्यांनी फोनवर सांगितलं होतं की, तिथे खूप वाहतूक कोंडी आहे, त्यामुळे त्यांना संगमला पोहोचण्यासाठी २१ किलोमीटर चालावं लागलं. ज्यामध्ये ते आणि त्यांचे साथीदार २० किलोमीटर चालले होते.
पूनम म्हणाल्या की, आपल्या पतीशी बोलल्यानंतर मी शांत झोपली, पण सकाळी उठल्यावर टीव्ही पाहून आणि मोबाईलवरून कळलं की, प्रयागराजमधील संगम येथे चेंगराचेंगरी झाली आहे. यामुळे माझं मन खूप अस्वस्थ झाले. पतीला अनेक वेळा फोन केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर शिवराज यांच्या मित्रांना फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही.
दुपारी १ वाजता, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत पतीचा मृत्यू झाल्याचं समजलं. शिवराज हे झारखंड स्टेट कॉपरेटिव्ह बँकेत काम करत होते. त्यांना २ मुलं आहेत. मुलगी स्वर्णा दिल्लीत काम करते आणि मुलगा शिवम बंगळुरूमध्ये नोकरी करतो. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.