Mahakumbh Stampede : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात आज मोठी दुर्घटना घडली. मौनी अमावस्येच्यानिमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी आज कोट्यवधी भाविक महाकुंभात आले होते. पण, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यासाठी शेकडो-हजारो भाविक त्रिवेणी संगमावर आले असता अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले आहेत. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
घटनेनंतर मृतांच्या आकडेवारीबाबत विविध माहिती माध्यमांमध्ये येत होती. आता घटनेच्या तब्बल 19 तासांनंतर पोलीस आणि न्यायपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मृतांचा आकडा जाहीर केला. दरम्यान, आजच्या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या सर्वांप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. काल रात्रीपासून आम्ही प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस, प्रशासन, NDRF, SDRF आणि इतर सर्व यंत्रणांना येथे तैनात करण्यात आले आहे.'
'सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस डीके सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे. आम्ही दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रण कक्षातून, मुख्य सचिवांच्या नियंत्रण कक्षातून आणि डीजीपींच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होतो. दिवसभर अनेक बैठका झाल्या, घटनेबाबत प्रशासनाशी सतत संवाद साधला जात होता. सकाळपासून पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे फोन आले आणि त्यांनी योग्य त्या सूचना केल्या.
पोलिसांनी दिली महत्वाची माहितीकुंभमेळा डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले की, महाकुंभमध्ये रात्री 1 ते 2 च्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. अचानक प्रचंड गर्दी झाली, भाविकांनी बॅरिकेड्स तोडले अन् त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील 30 मृतांपेकी 25 जणांची ओळख पटली असून, त्यापैकी 19 युपीतील, 4 कर्नाटकातील आणि 1 गुजरातचा आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर महाकुंबात प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.