Mahakumbh 2025 : प्रयागराज : उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्राह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. ३६ जखमींवर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये कर्नाटकमधील बेळगावचे ४, आसाम व गुजरातमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयीन आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिस चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने पावले उचलली आहेत. महाकुंभमेळा परिसरात वाहनांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्याचे आणि सर्व व्हीआयपी पास रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
४ फेब्रुवारीपर्यंत भाविकांना संगमावर पायी जाण्याची परवानगी असणार आहे. प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात फक्त दुचाकी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला प्रवेश दिला जाईल. तसेच, महाकुंभमेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मौनी अमावस्येच्या दुर्घटनेतून धडा घेत सरकारने आता ठोस पावले उचलली आहेत आणि महाकुंभमेळा परिसरातील व्यवस्थेत बदल केले आहेत. सरकारने महाकुंभमेळा परिसरातील रस्ते वन-वे केले आहेत. आता स्नान केल्यानंतर भाविकांना दुसऱ्या मार्गाने परत पाठवले जाईल. याशिवाय, प्रयागराजला येणाऱ्या ८ प्रमुख सीमा बंद करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
घटनेची न्यायालयीन चौकशीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. बुधवारी पहाटे आखाडा मार्गावरील बॅरिकेड ओलांडून काही भाविक अमृत स्नानासाठी गेले. आखाड्यांच्या अमृतस्नानासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. बॅरिकेड ओलांडून आलेल्या भाविकांमुळे गोंधळ निर्माण झाला व त्यातून दुर्घटना घडली.आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा घेतला.