Mahakumbh 2025 : त्रिवेणी संगमावर वसलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची धामधुम सुरू आहे. भारतासह जगभरातून भाविक कुंभमेळ्यात येत आहेत. तसेच, देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू-संतांनी कुंभात हजेरी लावली आहे. यातील काही बाबांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत. अशाच बाबांमध्ये जुना आखाड्याचे महंत राजपुरीजी महाराज आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. यांना त्यांचे अनुयायी प्रेमाने 'कबूतर वाले बाबा' म्हणतात. याचे कारण म्हणजे, त्यांच्या डोक्यावर कबुतर बसलेले असते.
कबूतर बाबा कोण आहे?राजस्थानच्या चित्तौडगड येथून आलेले बाबा म्हणतात की, पशूसेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे. गेली अनेक वर्षे ते डोक्यावर कबुतर घेऊन फिरतात. बाबा जिथे जातात तिथे भक्तांची मोठी गर्दी जमते. एका कबुतराने तर 9 वर्षांपासून त्यांच्या डोक्यावर तळ ठोकला आहे. महाकुंभाच्या पवित्र संगमात बाबांचे हे अनोखे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. बाबा आणि त्यांच्या डोक्यावर बसलेल्या कबुतराला पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात. त्यांच्याकडे येणारे भक्त केवळ आशीर्वादच घेत नाहीत, तर बाबांची शिकवण ऐकून आत्मिक शांतीचा अनुभव घेतात.
पाहा व्हिडिओ..
'जीवसेवा हीच श्रेष्ठ सेवा'बाबांच्या मते गौसेवा सर्वात महत्वाची आहे. जे लोक सजीवांची सेवा करतात, त्यांना आश्चर्यकारक आध्यात्मिक लाभ मिळतो. भक्तांना बाबांकडून केवळ प्रेरणा मिळत नाही, तर त्यांचा संदेश जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्नही होतो. डोक्यावर कबुतर घेऊन चालणारे बाबा, ही त्यांची ओळख तर बनलीच आहे, शिवाय महाकुंभाची विविधता आणि भव्यता दर्शवते.