MahaKumbh 2025: महाकुंभनगर : जगातील सर्वात मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांतीला विविध आखाड्यांच्या साधूसंतांनी त्रिवेणी संगमावर पहिले अमृतस्नान केले. या ठिकाणी मंगळवारी तब्बल ३.५० कोटी भाविकांनी स्नान केले. महाकुंभातील सर्वात पहिले पवित्र स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी पार पडले. प्रयागराज येथे देशविदेशांतून असंख्य लोक महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत.विविध आखाडे तसेच हिंदू धर्मातील विविध संप्रदायातील लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्यात स्नान केले. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभु पंचायती अटल आखाड्याच्या सदस्यांनी सर्वात पहिल्यांदा अमृतस्नान केले.
कडाक्याची थंडी असूनही...मंगळवारी ब्राह्ममुहूर्तावर तीन वाजता या अमृतस्नानास प्रारंभ झाला. कडाक्याची थंडी व तितकेच गार पाणी या कोणत्याही गोष्टींचा अडखळा न मानता कोट्यवधी लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्रिशूळ, भाले हाती घेतलेले, संपूर्ण शरीरावर राख फासलेले नागा साधू पहाटे स्नानासाठी संगमावर आले.काही साधू घोड्यावर बसून शाही स्नानासाठी मिरवणुकीने त्रिवेणी संगमावर जाताना दिसले. असंख्य भाविक संगमावरील घाटांकडे स्नानासाठी जात असताना, स्नान करत असताना हर हर महादेव, जय श्रीराम, जय गंगा मैय्या अशा घोषणा देत होते. महाकुंभमेळ्यात ५० हजारपेक्षा अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात असल्याचे सांगण्यात आले.
पवित्र स्नान करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झालेत्रिवेणी संगमावर विदेशातून आलेले लोकदेखील पवित्र स्नान करत होते. ग्रीसहून आलेल्या पिनेलोपी खन्ना यांनी सांगितले की, माझे पती भारतीय असून त्यांच्यामुळे योगसाधना करते. त्यांची महाकुंभाची माहिती दिल्यानंतर मी येथे येण्याचे निश्चित केले होते. त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मकरसंक्रांतीनिमित्त केल्या जाणाऱ्या स्नानाला अमृतस्नान, असे म्हणतात.
स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीचेही स्नान‘ॲपल’ या कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांची प्रकृती सोमवारी ठीक नव्हती. मात्र, मंगळवारी त्यांनी गंगेत पवित्र स्नान केले. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी स्नान केल्याचे सांगण्यात आले.भारतातील आध्यात्मिक परंपरेविषयी लॉरेन यांना विलक्षण आस्था आहे. लॉरेनला यांना त्यांचे गुरू महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांनी ‘कमला’ हे नवीन नाव दिले आहे. त्या अतिशय साध्या राहणीच्या व विनम्र स्वभावाच्या व्यक्ती असून त्यांना भारतातील धार्मिक गोष्टींमध्ये रस आहे.पंचायती अखाडा श्री निरंजनीचे महंत रवींद्रपुरी यांनी सांगितले की, लॉरेन यांना अध्यात्माची ओढ असून त्या पहिल्यांदाच महाकुंभमेळ्यात आल्या आहेत. मात्र, त्यांनी प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहणेच पसंत केले आहे.