‘महा’ चक्रीवादळ उद्या गुजरात किनारी धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:42 AM2019-11-06T06:42:22+5:302019-11-06T06:42:58+5:30

पावसाचा अंदाज : ठाणे, पालघरमध्ये कोसळधार; मुंबईत गडगडाटासह सरींची शक्यता

'Maha' cyclone Hurricane will hit Gujarat coast tomorrow | ‘महा’ चक्रीवादळ उद्या गुजरात किनारी धडकणार

‘महा’ चक्रीवादळ उद्या गुजरात किनारी धडकणार

Next

मुंबई : अरबी समुद्रावरील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळ ७ नोव्हेंबरच्या पहाटे ते दिव व पोरबंदरदरम्यान धडकेल, अशी शक्यता असून, बुधवारी मुंबई व परिसरात मेघगर्जनेसह किरकोळ पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, तसेच पालघर व ठाणे जिल्ह्यात मुसळधार सरी कोसळतील. गुरुवारी मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मुसळधार कोसळेल.

या चक्रीवादळामुळे बुधवार व गुरुवारी महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात सोसाट्याचा वारा वाहील. उत्तर कोकणातील तसेच गुजरातमधील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका गुजरातच्या किनारी भागांतच बसणार आहे. जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बोटाड, पोरबंदर आणि राजकोट येथे बुधवारी अति मुसळधार तर गुरुवारी भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बोटाड, वडोदरा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला आहे.

गावांमध्ये जनजागृती, मदतीसाठी नौदल सज्ज
‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेतली, तसेच डहाणू, तलासरी तालुक्यातील किनारपट्टीजवळील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. मदतकार्याकरिता भारतीय नौदलानेही चार जहाजे सज्ज ठेवली आहेत. 

Web Title: 'Maha' cyclone Hurricane will hit Gujarat coast tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.