एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेणारे लोक अनेकदा चुकीचे पाऊल उचलतात. असेच काहीसे उत्तर प्रदेशातील बलिया येथे घडले. तरुणीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर प्रेमीयुगुलाने व्हिडीओ कॉल करून विषप्राशन केले. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील रसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बउली गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रिया पाठक (वय, २०) आणि चिंतामन चौहान (वय, २४) व्हिडीओ कॉलिंगवर बोलताना विष प्राशन केले. या घटनेत प्रियाचा मृत्यू झाला आहे. तर, चिंतामनची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रिया आणि चिंतामन एकमेकांच्या शेजारी राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि चिंतामन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. पंरतु, दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. याचदरम्यान, प्रियाचे घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरवले. त्यानंतर दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी प्रियाची आई आणि चिंतामन यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, १२३ आणि ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.