भरधाव कार रस्त्यावरून घसरून कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघातमध्य प्रदेशमधील भोपाळ-इंदूर महामार्गावरील भैसाखेडी परिसरात गुरुवारी रात्री झाला. या कारमधून चार जण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हे चौघे मित्र ज्या हुंडाई व्हेन्यू कारमधून जात होते ती कार भरधाव वेगात होती आणि चालकाचं नियंत्रण सुटून ती रस्त्यावरून घसरून कडेला असलेल्या झाडावर आदळली, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातात विशाल दबी, पंकज सिसोदिया आणि प्रीत आहुजा यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या राहुल कंडारे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त कार ही कमलेश आहुजा याच्या मालकीची होती. अपघात झाला तेव्हा ही कार प्रीत आहुजा चालवत होते. तर विशाल दबी ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सिटवर बसला होता. तर राहुल कंडारे मागच्या सिटवर बसला होता. चारही मित्र गुरुवारी रात्री सिहोर येथील एखा ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. सिहोर येथून भोपाळ येथे परतत असताना हा अपघात झाला.
या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी विशाल दही हा कपड्याच्या दुकानात काम करत होते. तर पंकज सिसोदिया मेकॅनिक होता. प्रीत आहुजा याचं स्वत:चं कपड्यांचं दुकान होतं. तर जखमी राहुल कंडारेसुद्धा कपड्यांच्या दुकानात काम करतो.